ऑक्सिजन निर्मितीचा नंदुरबार पॅटर्न

– पहिली कोविडलाट ओसरतानाच जिल्हाधिका-यांनी ऑक्सिजन प्रकल्प उभारला

ऑक्सिजनची कमतरता, रुग्णमृत्यू या बातम्या सध्या आपण सारे रोजच वाचतो, पाहतो आहोत. महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्याने मात्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारून, पूर्ण क्षमतेने ते सुरू करून देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाचपैकी तीन प्रकल्पांचं काम पूर्ण क्षमतेने सुरू झालं आहे. हे घडलं कसं? कुणी घडवलं?

नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड या कार्यतत्पर अधिकाऱ्याचं हे काम. कोरोनाची पहिली लाट ओसरत आली असतानाच त्यांनी सप्टेंबर 2020 मध्ये दुसऱ्या लाटेला सामोरं जायची तयारी सुरू केली. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज भासेल हे समोर आलं आणि लगोलग डॉ. भारूड यांनी सीएसआर निधी आणि जिल्हा नियोजन निधी वापरून जिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प उभारला. नंतर लगेचच दुसऱ्या प्रकल्पाचंही काम सुरू झालं. तिसरा प्रकल्प शहाद्यातील कोविड केअर सेंटरमध्ये सुरू झाला. जिल्हा रुग्णालातील प्रकल्पातून 250 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर ऑक्सिजन हवेतून मिळवला जातो. त्यातून जवळपास 101 कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम हे दोन प्रकल्प करत आहेत. तर शहाद्यातील प्रकल्पातूनही 125 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर इतकी ऑक्सिजन निर्मिती होत असल्याने जिल्ह्याची साधारण 50 टक्के गरज भागवली जाऊ लागली आहे. नवापूर आणि तळोदा इथल्या प्रकल्पांचंही काम सुरू झालं आहे.

नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्याचं काम यातून झाल्याचं जिल्हाधिकारी डॉ भारूड सांगतात. जिल्हा रुग्णालयात डॉ. भारूड यांनी उभारलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आता देशासाठी दिशादर्शक ठरला आहे. योग्य वेळी निर्णय घेऊन आणि तो अमलात आणून डॉ. राजेंद्र यांनी त्यांची दूरदृष्टी दाखवून दिली आहे. त्यामुळेच कदाचित येत्या काही महिन्यात नंदुरबार जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायची शक्यता आहे.

-कावेरी परदेशी, नंदुरबार

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading