कोरोनाअनुभव भारताबाहेरचा

 

पेनसिल्वेनिया राज्याच्या पिट्सबर्ग शहरात आम्ही राहतो. करोनामुळे इथे साधारणपणे 17 मार्चपासून शाळा, ऑफिसेस बंद राहतील असं फर्मान आलं.
माझ्या पाचवीत असलेल्या मुलाला, शाळेने साधारणपणे एक आठवडा घरच्या घरीच असाइनमेंट करायला दिल्या आणि त्या नंतर रीतसर ऑनलाईन शाळा सुरू केली. आता ही टर्म तरी शाळा अशीच ऑनलाईन सुरू राहणार. माझा नवरा ही घरूनच त्यांचं काम करत आहे. तो आयटी क्षेत्रात असल्यामुळे त्यांना घरून काम करणे सहज शक्य आहे.
जेव्हा आता लॉकडाऊन होतोय अशी कुणकुण लागली त्याच दिवशी आम्ही जाऊन इंडियन स्टोअरमधून जी जमेल तितकं किराणा सामान घेऊन आलो. टॉयलेट पेपर आणि सॅनिटायझर तेव्हापासूनच out-of-stock झाले होते. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टनशी तुलना करता आमच्या इथं केसेसचं प्रमाण जरी कमी असलं तरी ते हळूहळू वाढत होतं.आम्ही बाहेर पडायचं नाही असं ठरवलं. आमच्या भागात तरी लोक आपणहून social distancing चे नियम पाळत होते. रस्त्यावर रहदारी अगदीच कमी दिसू लागली. आम्ही ही ग्रोसरी घरीच मागवू लागलो आहोत. ती पूर्णपणे स्वछ करून मगच वापरणं सुरू केलं आहे.

माझा धाकटा मुलगा खूपच लहान असल्याने आम्ही सर्व ती स्वच्छतेची खबरदारी घेत आहोत. त्याचं एक महत्त्वाचं लसीकरण मागच्या आठवड्यात झालं. तेव्हा एकदाच आम्ही बाहेर पडलो. त्याआधी हॉस्पिटलवाल्यांनी फोनवरच खात्री करून घेतली होती की घरात कोणी आजारी नाही. एकाच पालकाने मुलाला घेऊन यावे अशी ही त्यांनी विनंती केली. ते सगळं व्यवस्थित पार पडलं.
आम्ही इथं राहणारे म्हणजे या कम्युनिटीत राहणारे एकमेकांना ग्रोसरी आणून देण्यात मदत करत आहोत. अर्थात सर्व नियम पाळून.
न्यूज चॅनल लावले की इतक्या भयानक बातम्या कानी पडतात की हळूहळू आम्ही बातम्या बघणं बंद केलं आहे. आईवडिलांशी भारतात आमचा संपर्क सुरूच आहे. लांब असलो की आपल्याला घरच्यांची जास्त काळजी वाटते. पण सगळेच सर्व खबरदारी घेत आहेत. सगळं बघता, आम्ही आमची जून मधली भारत ट्रीप रद्द केली.
संपूर्ण जग ह्या करोनाशी लढत आहे. जे घडत आहे ते आधी कधीही घडलं नाही आणि ह्याची कोणीही कल्पनाही केली नव्हती त्यामुळे सर्वांनाच जड जात आहे.
घरोघरची तीच कहाणी आहे. जे आपण ह्या आधी गृहीत धरत होतो, ते किती महत्त्वाचं आहे ते आता लक्षात आलं आहे. सगळे आपापल्या परीने स्वतःला गुंतवून ठेवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत.

करोनाने ने मला काय शिकवलं? तर “कृतज्ञता”. वैद्यकीय सेवा देणारे, डॉक्टर्स, सफाई कर्मचारी, पोलीस, बँकतले कर्मचारी, पोस्ट सेवा करणारे, पब्लिक ट्रान्सपोर्ट, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये काम करणारे लोक, स्वयंसेवक आणि असे इतर अनेक.. या सर्व लोकांना सलाम!

किती जणांची नोकरी गेली आहे ह्या कठीण परिस्थितीमध्ये… छोट्या धंद्यांचे नुकसान होत आहे.. आर्थिक व्यवस्थेला चांगलाच धक्का बसला आहे. पण अर्थात हे सर्व बदलेल..सुधारेल.
आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित, आपल्या लोकांमध्ये मजेत आहोत. घरात जेवाखायला पुरेसे आहे. इंटरनेटच्या कृपेने आपल्या माणसांची संपर्कात राहता येत आहे. सगळी माहिती, विरंगुळा घरबसल्या मिळत आहे. शाळा आणि ऑफिस ऑनलाईन व्यवस्थित सुरू आहे. त्यात काही खंड नाही.
मला माझ्या कला जोपासता येत आहेत. कमीतकमी सामान वापरून वेगवेगळे पदार्थ बनवणे, doodling करणे, चित्रपट बघणे, वाचन हे सुरू आहे.
सगळं कुटुंब घरी आहे. एकत्र जेवताना कदाचित जास्तच गप्पा होत आहेत ज्या एरवी ही होत नव्हत्या. घरातली छोटी मंडळीही घरी जमेल तशी मदत करत आहेत. मुलांचा जास्त सहवास मिळत असल्याने आनंद वाटत आहे. छोट्या छोट्या गोष्टींची मजा घेता येत आहे. घरबसल्या सगळे मिळून निरनिराळे खेळ खेळत आहेत. सुप्त कला गुण बाहेर येत आहेत. आपल्या गरजा खरंच किती कमी आहेत हे लक्षात येत आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत कळत आहे.
करोना लवकरात लवकर नष्ट होवो..सगळं पूर्ववत होवो असं नक्कीच वाटतंय.
हा करोना खूप काही शिकवून ही गेला.

– अनिशा वाटवे, अमेरिका

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading