कोरोनाला विसरून त्याच्यामुळे मोकळं हसू शकतो
मागच्या वर्षी गुढी पाडव्याला अन्वय माझा ५ वर्षांचा मुलगा, त्याच्या आत्याकडे साताऱ्याला २ दिवस राहायला गेला. आणि अचानक लागलेल्या पहिल्या लॉकडाऊनमुळे तो जवळ जवळ १ महिना तिथं होता. मी आणि नवरा मुंबईत. अन्वयला आम्हा दोघांशिवाय, आजी- आजोबांकडे सात-आठ दिवस राहायची सवय होती पण साताऱ्याला ते नव्हते. इतके दिवस तो एकटा पहिल्यांदाच राहिला. बाहेर कोरोनाचा प्रभाव वाढत चालल्याने घरी बसण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. पण सातारच्या घरात भरपूर माणसं, अंगण, गच्ची असल्याने तो तिकडे रमला. साताऱ्याच्या आजोबांनी त्याला डाळी डब्यात भरणे, पालापाचोळा झाडणे, अंगणात फेऱ्या मारून आकडे मोजणे अशी नवीन कामे दिल्याने तसा मजेत होता. पण हा कोरोना राक्षस कधी जाणार? वगैरे प्रश्न चालू असायचे. याच काळात त्याने शिंगवाल्या कोरोना राक्षसाचं चित्र पण काढलं. एकदा सातारच्या घराच्या गेटवर उभा राहून – मास्क लावा, कोरोना फिरतोय असं जवळ जवळ २ तास ओरडून सगळ्यांना सांगण्याचा पराक्रम पण करून झाला. शेवटी एक महिना होत आला आणि लॉकडाऊन संपायचं नाव घेईना. तेव्हा मी आणि निखिलने स्पेशल परमिशन काढली आणि त्याला पुण्याला आणलं.
आम्ही दोघंही पूर्णवेळ काम करत होतो. डे केअर, शाळा सगळं बंद असल्याने अन्वयला घेऊन माझ्या आईबाबांकडे राहायचं आम्ही ठरवलं. भरपूर पुस्तकं, चित्र, गोष्टी यात तो रमला तरी मध्येच, आपण आपल्या घरी कधी जाणार हा प्रश्न असायचाच. हा कोरोना कधी जाणार म्हणून रडायला पण यायचं मध्येच. आम्ही एक ठरवलं की त्याच्या भावना त्याला मोकळेपणाने व्यक्त करू द्यायच्या. उगीच फार आदर्श आशावादी चित्र पण उभं करायचं नाही त्याला बरं वाटावं म्हणून. त्याची चिडचिड झाली, रडायला आलं की मी त्याला जवळ घेऊन त्याचं सगळं ऐकायचे. तुझं म्हणणं मला कळतंय. मला पण वाईट वाटतं, मला पण माझ्या ऑफिसची, मित्र मैत्रिणींची आठवण येते. सगळ्यांनाच होतंय असं आत्ता. हे आवर्जून त्याच्याशी बोलायचे. आत्ता काय करूया म्हणजे आपल्याला छान वाटेल? असे प्रश्न त्यालाच विचारून मग एखादा खेळ खेळणं, गोष्ट ऐकणं, गच्चीवर जाणं असं काहीतरी आम्ही करायचो. मोबाईल मुलांना लहान वयात देऊ नये यावर मी आणि निखिल ठाम असल्याने तो पर्याय म्हणून ही आम्ही त्याच्याकडे पाहिलं नाही.
निखिल पत्रकार असल्याने आणि सर्व काम घरून करावं लागत असल्याने दिवसभर टीव्हीवर बातम्या चालू असायच्या. तुम्ही काय सारख्या कोरोनाच्या बातम्या लावता? पासून पोलिसांनी लोकांना का मारलं? कोरोनाला काटे का असतात? कोरोना काय खातो? वगैरे असंख्य प्रश्न कधीपण आमच्या अंगावर आदळायचे. त्याची जमेल तशी, त्याला समजू शकतील अशी उत्तर आम्ही द्यायचो. आता कोणाचा मास्क नाकाच्या खाली असेल तर अन्वय त्यांना, कोरोना होईल मास्क वर घ्या असं सांगतो. आणि फोनवर बोलताना कोणी म्हणालं की, अन्वय तू आता आमच्याकडे कधी येणार की, आता पोलिसांना ई पास दाखवला तरच ते जाऊ देतात असलं उत्तर देऊन समोरच्याला चकित करतो. पण प्रत्येकवेळी खरी उत्तर देता येतात असंही नाही. कोरोनामुळे स्मशानात रांगेने ठेवलेले मृतदेह दाखवत असताना, हे काय आहे यावर – काही सामान बांधून ठेवलय तिथं. अशी उत्तरं देऊन वेळ मारून न्यावी लागते.
कोरोनाच्या या अवघड काळात अन्वयच्या शाळेची भूमिका मला खूप आवडली. तो गेल्यावर्षी बालवर्गात शिकत होता. इतक्या लहान मुलांना online अभ्यास नको हे शाळेने स्वतः ठरवलं. त्यामुळे बाकी पालक, मुलं झूम क्लासमध्ये नीट लक्ष देत नाहीत, आम्हाला कसं शेजारी बसावंच लागतं वगैरे सांगत असताना आम्हाला असं कुठलही प्रेशर नव्हतं. पालकांचा एक whataaap ग्रुप शाळेने केला होता आणि त्यावर मुलांना घरी करता येतील असे उपक्रम रोज दिले जायचे. त्यात अभ्यास नव्हता तर सोबत मज्जा करत नवीन गोष्टी शिकण्याची संधी होती. लिंबू सरबत बनवणे, घरातल्या वस्तू वापरून आकृती बंध बनवणे, पालकांसोबत बटाट्याची भाजी बनवणे, आपल्या कपड्यांच्या घड्या घालणे अश्या मस्त ऍक्टिव्हिटी असायच्या. कोणी मुलांना आकडे किंवा अक्षरं लिहायला लावून त्याचा फोटो टाकला तर शाळेच्या ताई सांगायच्या – नका अभ्यास करून घेऊ. आत्ता मुलांना खेळू दे, नवीन गोष्टी शिकू दे.
अजून एक गोष्ट मी या काळात जाणीवपूर्वक केली. अन्वयला सतत रमवणं ही माझी किंवा निखिलची जबाबदारी आहे असं त्याला वाटेल असं आम्ही वागलो नाही. आत्ता मला ऑफिसची मिटिंग आहे. तर तू शोध ना, तुला काय खेळायचंय? अश्या प्रकारे त्याच्याशी बोलत राहिलो. किंवा मी आता ऑफिसचं काम करून दमलेय मी आता माझं माझं पुस्तक वाचणार आहे. तू पण तुझं पुस्तक घेऊन शेजारी बसतोस का? किंवा काय करतोस? हे ठरवायचं स्वातंत्र्य त्याला दिलं. त्यातून त्याचे त्याचे अनेक वेगळे खेळ त्याने शोधले – गुहा बनवणे, स्वत: साहित्य ठरवून फेटे बांधणे, प्राण्यांसाठी घरे बांधणे असे कल्पक खेळ त्यानेच शोधून काढले. पुस्तकं वाचणं आणि प्राण्यांची चित्र काढणं ह्या त्याच्या अतिशय आवडीच्या गोष्टी. त्यामुळे पोस्टर कलर, वॉटरकलर, खडू वापरून चित्र काढणे, बाटल्या रंगवणे असे काही प्रकार मी आणि त्याने मिळून सोबत केले. आमच्या सुट्टीच्या दिवशी मात्र आम्ही तिघे आवर्जून एकत्र खेळ खेळतो, शब्दांच्या भेंड्या खेळतो. घरातली कामं आपण मिळून करायची हे बोलत आणि करत राहतो. आपल्याला काय आवडलं, काय नाही आवडलं, आज काय मज्जा आली हे आवर्जून एकमेकांना सांगतो. हे सतत एकमेकांशी बोलत राहिल्याने त्याला ही हे अवघड वास्तव स्वीकारायला त्यातल्या त्यात सोपं गेलं असं वाटतं. आणि त्याच्यामुळे, त्याच्या निरागस प्रश्नांनी, खोड्यांनी, कल्पक उद्योगांमुळे आम्ही ही दिवसातून २ वेळा तरी कोरोनाला विसरून मोकळं हसू शकतो.
– सई तांबे

Leave a Reply