ll अधिकाऱ्याचे ऐसे असणे ll भाषेचा अडसर दूर केला

 

भामरागडची बोलीभाषा माडिया आणि शाळेतली पुस्तकं मराठी. मुलांना पहिल्या वर्षी थेट मराठी विषय अभ्यासाला आल्यामुळे भाषेबद्दल काम करावं लागणार होतंच. एका वेळी दोन पुस्तकं हातात घेऊन शिक्षक शिकवू शकत नाहीत. त्यामुळे माडिया-मराठी असा शब्दकोश उपयोगाचा नव्हता. तेव्हा प्राची साठे या शिक्षणमंत्र्यांच्या ओएसडी होत्या. अश्विनीने त्यांची नागपूरला जाऊन भेट घेतली. नागपूरातल्या रिजनल अकॅडमिक ऑथॉरिटी या शासनाच्या संस्थेत अश्विनीने मुलांची मातृभाषा माडिया आणि शिक्षणाची माध्यमभाषा मराठी याविषयी एक प्रेझेंटेशन दिलं. मुलं शाळेशी जोडली जाऊ शकत नाहीत, याचं हेही एक कारण असल्याचं सांगितलं. त्यानंतर मराठी-माडिया असं अश्विनी आणि त्यांच्या टीमने तयार केलेलं दोनभाषी पुस्तक बालभारतीने आणलं. आदिवासी बोली आणि मराठी यांची सांगड घालणारं बालभारतीच्या इतिहासातलं हे पहिलंच पाठ्यपुस्तक. पुस्तकं वापरण्याचं प्रशिक्षण शिक्षकांना दिलं. त्याचा खूप चांगला फायदा झाला. कारण जेमतेम 10 ते 20 टक्के शिक्षक स्थानिक आहेत. या पुस्तकामुळे त्यांना मराठी आणि जिल्ह्याबाहेरच्या शिक्षकांना माडिया यायला लागली. या पुस्तकांमध्ये इथल्या स्थानिक कथा, चित्रं आहेत. इथं मुंग्यांची चटणी खातात. ती गोष्टही त्यात घेतली. मुलांना पुस्तकं आवडली. त्यानंतर अमरावतीतही कोरकू भाषेत पुस्तकांचा प्रकल्प सुरू झाला. अश्विनी म्हणतात, “स्थानिक भाषेची पुस्तकं असलीच पाहिजेत. त्याशिवाय मुलांना आपण मुख्य प्रवाहाशी जोडू शकत नाही.”
भामरागडला 10 वीचे निकाल कमी लागतात असं लक्षात आलं. तीही एक गंमतच आहे. अश्विनी येण्याआधी 97-98 टक्के निकाल लागायचा. त्या आल्या आणि प्रमाण 5 ते 10 टक्क्यांनी घटलं. कारण त्यांनी कॉप्या करू दिल्या नाहीत. अश्विनी गटशिक्षणाधिकारी असल्या तरी त्यांच्या हाताखाली माध्यमिक आणि आश्रमशाळा येत नाहीत. तरी त्यांनी मार्ग काढलाच. या शाळांच्या शिक्षकांसोबत एक प्रोजेक्ट. तीन आश्रमशाळांतल्या चांगल्या शिक्षकांना एकत्र केलं. त्यांच्याकडून प्रश्नसंच तयार केले. बऱ्याच शाळांमध्ये गणित, विज्ञानाला शिक्षक नाहीत. त्या मुलांना भामरागड इथं आणलं. इथल्या उत्तम शिक्षकांकडून या प्रश्नसंचांच्या आधारे शिकवणं सुरू केलं. आणि हा मजकूर लिहीत असतानाच अश्विनी मॅडमनी कळवलं की, कस्तुरबा गांधी विद्यालयाचा भामरागडचा निकाल यावेळी 92 टक्के लागला आहे. तोही कॉपीप्रकरणाविना. त्यांच्या मते, अजूनही खूप काम बाकी आहे. आठवी-नववीच्या वर्गांसाठी काम करायचं आहे. गणित, विज्ञानाच्या संकल्पना माडिया बोलीमध्ये कशा मांडता येतील असा विचार सुरू आहे.

हरलेला डाव जिंकला
भामरागड म्हणजे हरलेला डाव वाटायचा. सगळ्याच बाबतीत हा भाग मागे. अश्विनीला डाव जिंकायचाच होता. इथं प्रत्येक तालुक्यात शालेय क्रीडास्पर्धा होतात. नंतर जिल्हास्तरावर भाग घेता येतो. मागची दोन वर्ष काही कारणांनी स्पर्धा झाल्या नव्हत्या. यावर्षी भामरागडने चॅम्पियनशीप मिळवायचीच, असं अश्विनीने ठरवलं. त्या सांगतात, “सगळ्या शिक्षकांशी मी बोलले. त्यावर शिक्षकांचं म्हणणं, छे मॅडम, सगळ्यात छोटा तालुका आपला. अडीच हजार विद्यार्थी. बाकी तालुक्यात 10-15 हजार विद्यार्थी आहेत. आपल्याला काही मिळणार नाही”. पण मी म्हणाले, “मला हवीये ट्रॉफी आणि आपण प्रयत्न करू.” अश्विनी मॅडम हार मानणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे प्रयत्न सुरू झाले. चांगल्या खेळणाऱ्या मुलांची संख्या कमी होती. मग प्रत्येक केंद्रातून चांगला खेळणारा मुलगा शोधला. त्याला तालुक्याला आणलं. एकच टीम कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल असं खेळायची. कारण विद्यार्थीसंख्या कमी. टीम तयार करणार तरी कशी? मग कबड्डी, खो-खो चांगलं खेळणार्‍या शिक्षकांना जबाबदारी दिली. मुलांकडून कसून सराव करून घेतला गेला. शेजारच्या तालुक्यातच स्पर्धा होत्या. तिथं ‘झांकी’ म्हणून त्या त्या भागाच्या नृत्यसादरीकरणाला दोन भाषणांच्या मध्ये पाच मिनिटांची वेळ दिली जाते. भामरागडच्या नृत्याला खूप बक्षीसं मिळाली, खूप कौतुकही झालं. दुसऱ्या दिवशी सामने होते. थोडी धाकधूक होती. कारण भामरागड तालुक्यात फक्त 77 शाळा आहेत. आणि तिथं आलेले 200-250 शाळा असलेले अन्य तालुके. संख्या कमी असली तरी मुलांनी महिनाभर केलेली मेहनत होतीच. शिक्षकांचं, मुलांचं मनोधैर्य वाढलं होतं. पण मोठे तालुकेच नेहमी जिंकतात असा पूर्वग्रह. प्रत्यक्षात पहिल्या दिवशीचे सगळे सामने भामरागडनेच जिंकले. दुसऱ्याही दिवशी तेच. फायनलला काही मॅचेस जिंकता आल्या. चॅम्पियनची ट्रॉफी प्राथमिक फेरीत मिळाली. भामरागडनी ट्रॉफी कशी काय घेतली, हेही सगळ्यांना वाटत राहिलं. म्हणजे मुलांच्यात क्षमता होती. ती फुलवणारं माणूस तिथं गरजेचं होतं. अश्विनीसाठी तो दिवस खास होता. त्या सांगतात, “हरलेला डाव मी जिंकले होते”.
ll भाग 3 ll
– वर्षा जोशी-आठवले

Leave a Reply