ll माझं बदलतं गाव ll आमची वाडी, जाधववाडी

सातारा जिल्ह्यातील कराडपासून साधारण २० किमीवर आमची जाधववाडी आहे. मोजून १५ घरांची वस्ती, २०० लोकसंख्या. कोणत्याही वस्तीला जेव्हा वाडी शब्द जोडला जातो तेव्हा तेथील लोकसंख्या कमी व त्या आडनावाची वस्ती जास्त असाच अर्थ निघतो. आमच्या वाडीपासून २ किमीवर असलेल्या पाचुपतेवाडीसोबत आमची गट ग्रामपंचायत आहे. वाडीतच माझं बालपण गेलं. छोटी असल्याने वाडीत एकोपा. कुणाचं लग्न कार्य असो किंवा श्राद्ध लहान पोरांपासून थोरांपर्यंत सगळे जमून धमाल असायची. आमची बच्चे पार्टी तर वाढपी मंडळी म्हणूनच पुढे. आता वाडीत यायला ट्रक जाऊ शकेल एवढा डांबरी रस्ता झालाय. पूर्वी साधी पायवाट देखील नव्हती. पावसाळ्यात वाडीत यायला कुणीच धजत नसत. पाऊस जोरात पडला की आमची शाळेची सुट्टी आणि मोठ्यांची कामाची सुट्टी ठरलेली.

गावात प्रवेश करतानाच मोठा वड, किनई, ऐन, एरंड, कारंज, बोरीची झाडं होती. सगळ्या झाडामधून स्वच्छ सुंदर ओढा जात होता. लहान असताना आम्ही त्या ओढ्यात खेळत असू, पाणी स्वच्छ करणारा निवळ्या (water scatter) कीटक पकडण्यात शर्यत लागे. त्या संपूर्ण भागाला गोठणी असं म्हणतात. रस्तारुंदी झाली आणि सगळी झाड तोडावी लागली. हळूहळू हवाबंद व पाकीट बंद पदार्थ गावात येऊ लागले. ते मोठ्या प्रमाणात आहारात आले आणि आता सगळा कचरा ओढ्यात जात आहे.

वाडीपासून दहा मिनिटांवर वांग नदी आहे. पुढे ती कोयनेला मिळते. नदीवर धबधबा आहे. पावसाळ्यात पाणी वाढल्याने प्रजननासाठी वर जाणारे मासे पकडण्यात सगळी वाडी जमे. सकाळी शेतातील कामे उरकून पुरुष मंडळी घळ टाकून रात्र रात्र जागून खेडके, मासे पकडत. पावसाळ्यात सगळ्या वाडीतून मासे भाजल्याचा खरपूस सुवास दरवळतो. नदीवरचा धबधबा साधारण आठ पुरुष खोल असावा. आमच्या वाडीतला प्रत्येक मुलगा याच नदीवर पोहायला शिकलाय. उड्या टाकताना अनेक कसरती करायला मजा येई. झाडावरच नाही तर पाण्यात सुध्दा आम्ही शिवणापाठीचा (पकडपकडी) खेळ खेळत असू. नदीवर सारखं पोहायला घरातले मनाई करत मग सगळेच अंग सुकेपर्यंत काळ्या खडकावर सन बाथ घेत असू. नदीच्या बाजूला असलेल्या शेती भागाला मळी म्हणतात. शेतात पाणी साठत असल्याने तिथं भात पेरला जातो. पावसाळ्यात पाथरी, तेरा, कुरडू, केना, टाकळा, मशरूम अशा रानभाज्या खाल्ल्या जातात. प्रत्येक घरी खिलार बैल जोडी असायचीच. पूर्वी पावसाळ्यानंतर नदीचं पाणी आटायला सुरुवात व्हायची. उन्हाळ्यात नदी आरामात ओलांडता येत असे. आता मात्र मराठवाडी इथं धरण झाल्याने नदीला कायम पाणी असतं. सह्याद्रीचाच भाग असल्याने काळाकुट्ट बेसाल्ट सगळ्या नदीवर पसरला आहे. त्याच कारणाने नदीवरचा दगड बांधकामासाठी वापरला जाऊ लागला. १५ फूट उंचीचा धबधबा आता पाच फूट देखील राहिला नाही. याच वर्षीच्या पावसात नदीला आलेल्या पाण्याने प्रचंड नुकसान झालं. पूर्वी शेतात भुईमूग,कारलं,सूर्यफूल, मका, ज्वारी, घेवडा, हरभरा,वाटाणा अशी असंख्य पीक व्हायची. हिवाळ्यात पावट्याचां भात, हुरडा पार्टी, हरभरा भाजून खाणे असे उत्सव मोठ्या गजबजाटात होतं. एक जण कांदा, एक जण तांदूळ, एक जण मसाले, कुणी लाकडं आणत. शेतात भात बनवून करपेपर्यंत शिजवला जाई, करपलेला भात खाण्यात सगळ्यांची स्पर्धा लागे. प्रत्येक घरात गाई, म्हशी असल्याने कुणीही रासायनिक खत वापरत नव्हते. म्हशीला रेडकू झालं की, पहिल्या दुधाचा (चिकाचा) खरवस करून सगळ्या वाडीला दिला जाई, त्याच्या बदल्यात लोक वाटीभर तांदूळ देत. आता वाडीत मोजून तीन म्हशी आहेत. अनेक लोक पिशवीतील दूध वापरतात. नदीला पाणी आलं, पण आता मात्र सगळ्यांनी जनावरे विकून नुसता ऊस, सोयाबीन याच पिकांवर भर दिला आहे.

नदी जवळ असल्याने वाडीत थंडी बोचणारी. संध्याकाळी सात वाजता घरात गेलेला माणूस सकाळी सातपर्यंत बाहेर पडत नाही. काही चिल्लीपिल्ली तसेच मोठी माणसं जनावरांनी खाऊन उरलेला चारा जाळून शेकोटी करतात. आम्ही लहानपणी पहाटे पहाटे उठून बोरं गोळा करायला जायचो. कुणी किती खिसा भरून बोरं गोळा केली याची शर्यत लागे. हिवाळ्यात भरपूर गवत असल्याने माळरानावर सगळ्यांच्या म्हशी मनसोक्त चरत. आम्ही बगळ्याप्रमाणे म्हशीवर बसून सफरीचा आनंद घेत असू. होळीला बोंबलताना सगळ्यांचा घसा निघे. त्यानंतर रंगपंचमी दिवशी त्याच राखेने सगळे रंगून जात.

उन्हाळ्यात मोठ्यापासून लहानांना आराम मिळायचा. शेतातील कामे उरकली की लगीन घाई सुरू होई. नवरी मुलीला द्यायला अनेक जिन्नस बनवले जात. वाडीतील वृध्द महिला लग्नात ओव्या म्हणतात. गाणी नीट ऐकल्यास त्याचा अर्थ सहज लक्षात येतो. वर्षभर टिकावे म्हणून कुरडई,पापड, भातवड्या, चकली बनवली जात. गावातल्या प्रत्येक घरात ही पद्धत आहे. महिला एकमेकींना मदत करत सगळ्या घरातील उन्हाळी पदार्थ बनवून होत. सगळ्यात मोठ्या प्रमाणात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे कांदा लसूण मसाला (चटणी). कितीतरी प्रकारचे मसाले, बेडगी – लवंगी मिरची, भरपूर कांदा टाकून वर्षभर टिकणारा मसाला बनवण्यात येई. वाडीतील प्रत्येक महिलेला त्याचं योग्य प्रमाण माहिती आहे. आईने लेकीला दिलेलं हे पारंपारिक ज्ञान असंच पुढे जात राहतं.

वाडीच्या दोन्ही बाजूस कूपनलिका आहे. त्यामुळे वाडीला कधीच पाण्याचं दुर्भिक्ष जाणवलं नाही. उलट बाजूच्या गावातून लोक पाणी घेण्यासाठी वाडीत येत. आता नळयोजना आल्याने घरपोच पाणी मिळतं, नळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात शुध्दीकरणासाठी क्लोरीन वापरलं जातं. म्हणून सगळे जण खास पिण्यासाठी म्हणून दोन कळशी बोअरवेलच पाणी वापरतात. पूर्वी गावात डांबावर लाईट नव्हते. त्यामुळे वाडीत रात्री येण्यासाठी धजत नसे. वाडी असल्याने चोरी झाल्यास लोकांमध्ये भय निर्माण होई. कुणी आजारी पडलं, कुणाला साप चावला तर दवाखान्यात नेईपर्यंत माणूस दगावण्याची शक्यता जास्त असायची. आता मात्र गावात रस्ते आले, वीज आली त्यामुळे अशी ने-आण सोपी झाली.

गावात काही बदल महत्त्वाचे असतात तसंच काही बदल कधीच घडायला नको असं वाटतं. जमीन मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी वापरली जात आहे. ज्या झाडांवर आम्ही खेळलो ती झाडं सर्रास तोडली जात आहेत. प्रत्येक ऋतुप्रमाणे गाव बदलत, बहरत होता. आता मात्र सगळेच ऋतू एकत्र येतात. डोंगरावरची जंगल तोडली म्हणून माकड,मोर, साळिंदर अगदी बिबट्या,डुकरे,कोल्हे सुध्दा शेतात येऊन नुकसान करत आहेत. रेशन कार्डवर सगळी धान्य मिळतात, कुणी शेती करायला मागत नाहीत. चैनीसाठी, पोटासाठी गावातील तरुण मंडळी शहरात जायला लागली. वाडीत राहणारे लोक अगदी हातावर मोजण्या इतकेच आहेत. त्यात सगळे वयोवृध्द. कुठलाच उत्सव पूर्वीसारखा होत नाही. गाणी म्हणायला, उत्सव करायला कुणाकडे सवड नाही. सगळ्यांकडे भरपूर पैसा आला, त्याच बरोबर अहंकार देखील आलाय. मी तुझ्या घरी, तू माझ्या घरी कामाला येणं हे अप्रतिष्ठेचं समजलं जातं. पुढच्या पिढीला दाखवायला एक सुध्दा मातीचं घर नाही. शेतीच, संस्कृतीचं, परंपरेचं ज्ञान जपणारी शेवटची आमचीच पिढी असेल, असावी. कुणीच लगोर, गोट्या, आट्यापट्या, लंगडी खेळत नाही. वाडीत आता स्मशान शांतता नांदते.

– संतोष बोबडे, सातारा

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading