ll समाधानाचे क्षण ll आयपीआरच्या दुनियेत

 

 

मित्राच्या बोलण्याचा आधी त्रास झाला होता, पण तो म्हणतोय त्यात तथ्य आहे हे जाणवलं. त्यामुळे आता हा विषय शिकून घ्यायचाच हे पक्कं ठरवलं आणि त्यासाठी पुन्हा त्या मित्रालाच कॉल केला. तो म्हणाला, “हैदराबादची ‘नालसार’ ही प्रसिद्ध संस्था आहे, त्यांचे ‘इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉज’ या विषयावरचे डिस्टन्स लर्निंगचे कोर्सेस आहेत, ते कर. वर्षभरातून दोन तीन कॉन्टॅक्ट सेशन्स अटेंड करावे लागतील फक्त.” खरं तर त्याच्या कॉलनंतर मी लगेचच आयपीआर शिकायचा निर्णय घेण्याची गरज नव्हती, कारण तेव्हा मी नुकतंच माझं पीएचडी सुरू केलं होतं. तो अभ्यास,शिवाय माझी नोकरी आणि घरची जबाबदारीही होती. पण माझा काहीसा ‘इम्पल्सिव्ह डिसिजन’ घेण्याचा स्वभाव आहे. ‘आतला आवाज’ ऐकून मी चटकन निर्णय घेते, काही वेळेला या स्वभावाचे फायदे होतात तर कधी तोटे होतात.

मी हा कोर्स करायचं ठरवलं. फीदेखील भरून टाकली. घरी पुस्तकं आली. पहिलं सेशन मुंबईला झालं. बरीचशी आयपी (बौद्धिक संपदा) क्षेत्रातील मंडळी माझ्यासोबत शिकायला होती. शिकवणारी डॉ. रेड्डीजचे आयपीआर हेड, वगैरे दिग्गज माणसं होती. सुरूवातीला हा विषय अवघड वाटला, डोक्यावरून जाऊ लागलं. पण ते सगळं इंटरेस्टिंग आहे, हे ही जाणवत होतं. वर्षाखेरीस परीक्षा होणार होती. जसजसं वाचायला लागले, तसतशी मजा येऊ लागली. कायद्याच्या किचकट भाषेचे पापुद्रे दूर करून गाभ्याशी गेलं, ते तत्त्व समजावून घेतलं की विषय सोपा वाटू लागला. चांगला अभ्यास केला आणि त्या वर्षी भारतात मी त्या परीक्षेत दुसरी आले. आनंद झाला.

मग, माझ्या कॉलेजमध्ये मी हाच ‘इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ’ हा विषय अध्यापनासाठी मागून घेतला. मी शिकवायला लागले, मुलांनाही आवडायला लागलं. उदाहरणं देऊन मी तो विषय सोपा करायचे. पण वाटायचं, फक्त ‘आयपीआर’ मधला डिप्लोमा पुरेसा नाही, आपण कायद्याबाबत आणखीही शिकायला हवं. पुढे 2012 मध्ये माझं पीएचडी ‘फार्मास्युटिकल सायन्स’ या विषयातलं पीएचडी पूर्ण झालं. माझ्या मनातले विचार मी त्याच मित्राला पुन्हा बोलून दाखवले. तो म्हणाला, “तुझ्या मनात येतंय ना, मग लॉची डिग्री पण घेऊन टाक की! सोप्पं नाहीए ते, मीही प्रवेश घेतला होता. पण मध्येच सोडून दिलेलं, पण तू नक्की करू शकशील. ” लगेच जुलैमध्ये आमच्याच संस्थेच्या लॉ कॉलेजमध्ये एलएलबीला प्रवेश घेतला.

एलएलबीची सकाळची लेक्चर्स अटेंड करणं मला क्वचितच जमलं. कारण माझी नोकरीही होती. मी स्वयंअध्ययनच करायचे. एलएलबीलासुद्धा मी कॉलेजात पहिली आले. तिन्ही वर्षी फर्स्ट क्लास मिळवला. हा कोर्स करत असतानाच मला कळलं की, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ मध्ये एलएलएमचा एक उत्तम कोर्स असतो. वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO), जिनिव्हा आणि इटलीमधील तुरिन युनिव्हर्सिटी यांचा हा एकत्रित कोर्स असतो. हे एलएलएम फार प्रतिष्ठेचं मानलं जातं, आणि अर्थात तशीच दणकट चाळीस हजार युरो वगैरे त्याची फी असते. मात्र या कोर्ससाठी अर्ज केलेल्या जगातल्या 11 विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीच्या, हुशारीच्या जोरावर पूर्ण फेलोशिप मिळते. पुन्हा एकदा, आतल्या आवाजाने साद दिली की, हा कोर्स मी करायलाच हवा. जे स्वत: ‘आयपीआर’ शिकवतात त्यांना फेलोशिप मिळते, असं समजलं. त्या ही कॅटॅगरीत मी बसत होते.

मी या एलएलएमसाठी अर्ज केला. नीट तयारीनिशी, भरपूर मेहनत करून सर्व डॉक्युमेंटस, स्टेटमेंटस ऑफ पर्पज वगैरे भरलं. आणि तुरिन युनिव्हर्सिटीच्या उत्तराची वाट पाहू लागले. एकीकडे मनाला समजावत होते, हे सोपं नाही, जगभरातून फक्त 11 जणांना फेलोशिप मिळणार आहे. दुसरं मन म्हणत होतं, मग काय झालं, माझा नंबर लागूच शकतो की! आणि तो दिवस उजाडला, तुरिन युनिव्हर्सिटीकडून मला ‘तुमची फेलोशिपकरिता निवड होऊ शकत नाही’ असा इमेल आला. जे नको होतं, तेच झालं- नकार मिळाला.

– डॉ. मृदुला देशमुख- बेळे

Leave a Reply