मारोतीरावांची जिद्द भारी, त्यांना गवसलं पाणी

बीड जिल्ह्यातला गेवराई तालुका. पाऊस कमी झाला की बीड जिल्ह्यात दुष्काळ ठरलेलाच. पाच वर्षापूर्वी जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर या तालुक्यांनी दुष्काळाचे चटके सोसलेले आहेत. यात गेवराई तालुक्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. गेवराई तालुक्यातल्या पाडळसिंगी गावातल्या एका शेतकऱ्याने मात्र या दुष्काळावर कायमस्वरूपी इलाज केलाय तो कोणता? चालू वाचूया.

पाडळसिंगी गावात मारोतीराव बजगुडे यांची 12 एकर कोरडवाहू शेती. शेतीला मंडपाचा जोडधंदा आहे. कमी पावसामुळे ओढावणाऱ्या दुष्काळामुळे त्यांच्या  शेतीला  पाणी मिळत नव्हतं. तेव्हा त्यांनी शेततळे तयार करायचं ठरवलं. पण या तळ्यात फक्त पावसाचं ठराविक पाणी साचेल असा विचार त्यांच्या मनात आला. मग काय करायचं असा विचार करता करता तीन वर्षांपूर्वी त्यांनी एक एकरात विहिर खोदायचं ठरवलं.

 

त्यांच्या शेताजवळूनच येडशी औरंगाबाद हा राष्ट्रीय महामार्गाचे जातो. या महामार्गासाठी त्यांची काही जमीन गेली. त्याचे त्यांना तेव्हाच 25 लाख रूपये मिळाले. अडीच एकर जमीन त्यांनी बहिणीला विकली. त्यातूनही काही पैसे जमले. सोबतच महामार्गाचे काम करणाऱ्या आयआरबी कंपनीने त्यांना विहिर खोदण्यासाठी मदत केली. खोदकामातून निघालेला मुरूम त्यांनी कंपनीला दिला. त्याचेही 15 लाख मिळाले. आता बजगुडे यांच्या हातात जवळपास दीड कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे विहिर पूर्ण करायचीच असा निश्चय बजगुडे यांनी केला.

साडेसहा महिने चाललं खोदकाम

या विहिरीच्या खोदकामासाठी साडे सहा बांधकामासाठी अडीच महिने लागले. जवळपास ८० मजूर या विहिरीसाठी काम करत होते. विहिरीतुन निघालेला मुरूम व पाषाण वाहून नेण्यासाठी १२ हायवा, आठ जेसीबी  लावण्यात आले होते. विहिरीच्या खोदकामासाठी एक कोटी तर बांधकामासाठी पन्नास लाख रूपये असा एकूण दीड कोटी रूपये खर्च आल्याचं बजगुडे सांगतात. या विहिरीत आता दहा कोटी लिटर पाणी साठले असून ही विशाल विहिर पाहण्यासाठी बीडसह इतर जिल्ह्यातून शेतकरी या गावात येत आहेत.

कोरडवाहू शेती झाली बागायती

मारोतीराव बजगुडे यांची कोरडवाहू शेती आता बागायती झालीये. मारोतीरांवांनी टरबूज, पेरूसह आठ एकरात मोसंबीची लागवड केली आहे. बजगुडे सांगतात, माझ्या एक एकरातील विहिरीत मी  दोन बोअर घेतले असून दोन पुरूष खाली विहिरी खोदल्यांनतर पाषाण लागला होता. पाषाण फोडून विहीर साडेपाच पुरूष खोल घेण्यात आली. आता समजा दोन वर्षं पाऊस पडला नाही तरीही या विहिरीमुळे तब्बल ५० एकर जमीन सिंचनाखाली येऊ शकते.

– दिनेश लिंबेकर, बीड

Leave a Reply