सांजसोबत
ज्याच्या मनात संवेदनशीलता आणि अस्वस्थता जागी आहे असा प्रत्येकजण आजूबाजूच्या जगातले प्रश्न आणि समस्यांकडे पाहताना ‘आता आपण काहीतरी केलं पाहिजे’ या भावनेला सामोरा गेलेला असतो. काहीजणांच्या बाबतीत ही भावना कृतीत न उतरल्यानं त्यांची अस्वस्थता केवळ शाब्दिक बुडबुड्यांच्या रूपात शिल्लक राहते. पण काहीजण मात्र आपल्या भावनांना कृतीच्या चौकटीत बसवतात. प्रामाणिक हेतूनं सुरु केलेल्या एका लहानशा कृतीचा प्रवाह धीम्या गतीने परंतु निश्चित अशा दिशेने वाहत राहतो.
वर्ष २०१५. तेव्हा चिपळूणमध्ये शाळासोबत्यांचं एक स्नेहसंमेलन भरलं होतं. आपली देशभक्ती सोशल मिडियावरच्या लाईक, कमेंट, शेअर, फॉरवर्डच्या पुढे न्यायची असेल तर देशाची कोणतीही एक समस्या मुळाशी जाऊन सोडवायला हवी असा रोखठोक विचार पराग वडकेने त्यावेळी आपल्या मित्रमैत्रिणींसमोर मांडला आणि सगळ्यांच्या विचारांची चक्रं फिरू लागली. एका परिचित व्यक्तीशी झालेल्या चर्चेतून कोकणातील गावागावांमध्ये असलेल्या वृद्ध, निराधार लोकांची समस्या परागच्या लक्षात आलेलीच होती. एका संध्याकाळी घरी परतत असताना कमरेतून पूर्ण वाकलेल्या, थकून रस्त्याच्या कडेला टेकलेल्या एका वृद्ध स्त्रीची विचारपूस करताना त्याच्या विचारांना निर्णायक वळण मिळाले. दीडदोनशे रुपयांच्या कमाईसाठी दररोज सात किलोमीटर अंतर तुडवणारी ती आजी हृदयविकाराने त्रस्त आहे हे कळलं. जिवंत रहायचं असेल तर तिला हे कष्ट उपसणं भागच होतं. त्यातून मिळणारी कमाईसुद्धा पुरेशी होती असे अजिबात नाही. चिपळूणच्या पंचक्रोशीत गावागावात असे आजीआजोबा दोनवेळच्या जेवणासाठी न झेपणारी मजुरी करत, वेळप्रसंगी भाताच्या पेजेवर भूक भागवत जगत आहेत हे वास्तव परागने आपल्या समविचारी मित्रमंडळींसमोर मांडले. सोशल मिडीयावर आपले अनुभव शेअर केले. या विचारमंथनातून जन्माला आली या वृद्धांच्या आयुष्यातील ‘सांजसोबत’. चिपळूण परिसरातील निराधार वृद्धांना दर महिन्याचा किराणा माल त्यांच्या घरी पोच करायचा अशी योजना ठरली. त्यासाठी आर्थिक तरतूद आणि इतर सर्व व्यवस्था कशी करायची याचा बिनचूक आराखडा तयार झाला.
गेल्या पाच वर्षात सांजसोबतचे ३२० सभासद झालेले आहेत. हे सभासद प्रत्येक महिन्याला आपापल्या कुवतीनुसार एक विशिष्ट रक्कम जमा करतात. महिना १०० रुपये देणा-या सभासदापासून ते एकदोन वृद्धांना दत्तक घेणा-या सभासदांपर्यंत सर्वजण सांजसोबत परिवाराचा हिस्सा आहेत. एका वृद्ध कुटुंबाला एका महिन्याला तेलापासून मिठापर्यंत सर्व किराणा माल देण्यासाठी ११०० ते १२०० रु. खर्च येतो. सध्या अशा ९० वृद्धांना किराणा पोचवला जात असून १० वृद्ध वेटिंग लिस्टमधे आहेत. आपली मदत कोणापर्यंत पोचवायची हे ठरवण्यासाठी सांजसोबतचे सदस्य या वृद्धांच्या घरी समक्ष भेट देतात, सगळ्या माहितीची खातरजमा झाली की मगच नवीन वृद्धांना सामावून घेतलं जातं. दरमहा गोळा होणा-या रकमेतली ७०% रक्कम किराणा माल खरेदीसाठी वापरली जाते आणि उर्वरित ३०% रक्कम ‘अडचणीच्या काळात’ वापरण्यासाठी बाजूला ठेवली जाते. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सांजसोबतचे स्वयंसेवक हा माल घेऊन डोंगर-दऱ्यातील वाटांवरून आजीआजोबांच्या दारात पोचतात. त्यांची विचारपूस करून आणि त्यांची माया सोबत घेऊन परत येतात. दिवाळीच्या आधी फराळासोबतच नवी साडी/धोतर, तेल-उटणं-साबण आठवणीने पोच केला जातो. होळीच्या पुरणपोळ्या आजीआजोबांपर्यंत आवर्जून पोचवल्या जातात. कधी कोणत्या म्हाताऱ्याच्या घरी सोलरचा लाईट लावून दिला जातो तर कधी कुणी कार्यकर्ता एखाद्या आजीबाईच्या आयुष्यातले अखेरचे काही दिवस सुखात जावेत यासाठी तिला स्वतःच्या घरात घेऊन येतो. या सगळ्याची भरपाई हे थकलेभागले जीव दाराशी येणाऱ्या मुला-नातवंडांच्या पाठीवर मायेचा हात फिरवून तर कधी कपभर चहा पाजून करतात.
सुचिता धामणस्कर या सांजसोबतच्या कार्यकर्त्या. त्या म्हणतात, “कार्यकर्ता अशी नवीन ओळख अभिमानाने सांगावी वाटते. ज्यांना गरज असेल अशा लोकांसाठी काहीतरी करावं असं कायम वाटायचं. जमेल तसं आतापर्यंत करतही आले, पण ही सेवा दर महिन्याला माझ्याकडून घडते याचं समाधान एक वेगळंच आहे. पराग सरांनी सांगितलं की आपण कायम सर्व वृद्ध सोबत्यांना आई आणि बाबा अशीच हाक मारायची कारण त्यांना या प्रेमाचीच नितांत आवश्यकता आहे. ज्यावेळी मी पहिल्यांदा “बाबा” म्हणून हाक मारली तेव्हा अक्षरशः माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं… आज 80 पेक्षा जास्त आजी-आजोबांचं कुटुंब म्हणजे “सांजसोबत” आणि या कुटुंबाचा एक भाग होण्याचं भाग्य मला लाभलं याचा सर्वार्थाने आनंद आणि अभिमान वाटतो.
सांजसोबतची कार्यप्रणाली ‘देश माझा मी देशाचा – देशाची समस्या माझी समस्या – मीच सोडवणार’ या सूत्रावर चालते. पराग वडके, यतीन जाधव, अशोक भुस्कुटे, काश्मीरा शेंबेकर, नेत्रा पाटील, रमा करमरकर, सुभाष केळकर, अभय अंतरकर, विश्वास खाडीलकर, संजय सुर्वे आणि यांच्यासह चिपळूणबाहेर अगदी परदेशात वास्तव्य करणारे अनेक कार्यकर्ते आपल्या नावाचा आणि कामाचा गवगवा न करता अत्यंत शांतपणे गेली पाच वर्षं सांजसोबतच्या माध्यमातून ‘देशभक्ती’ निभावत आहेत. ज्याला काहीतरी करायचे आहे परंतु वेळ देणे शक्य नाही त्यांनी आर्थिक मदत द्यावी, ज्यांना वेळ देणे शक्य आहे त्यांनी वितरणाच्या कामात भाग घ्यावा अशी साधीसोपी विभागणी आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकेच्या स्टेटमेंटसह संपूर्ण चोख हिशेब सर्व सभासदांसमोर ठेवला जात असल्याने कसल्याही शंका/गैरसमज यांना जागाच नाही.
गेल्या वर्षी चिपळूणवर महापुराचे संकट ओढावले. सांजसोबतने महापुरातून सावरणा-या अनेकांना मदतीचा हात दिला. मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, ताडपत्री अशा साहित्यासोबतच छोटे व्यावसायिक, रिक्षाचालक, अशा अनेकांना आर्थिक मदत देऊन आपापले व्यवसाय पुन्हा उभे करण्यासाठी आधार दिला. सांजसोबतच्या विश्वासार्ह आणि पारदर्शी कार्यपद्धतीबद्दल खात्री असल्याने पूरग्रस्तांसाठी मदत देणारे अनेकजण सांजसोबतच्या माध्यमातूनच आर्थिक साहाय्य देण्यासाठी आग्रही होते.
सांजसोबतचे संस्थापक सदस्य अशोक भुस्कुटे एका आजींचा किस्सा सांगत होते. “काल परवाच जिन्नस पोहचवून गेलात आणि आज तुम्ही परत आलात. काही कारण असल्याशिवाय तुम्ही येणार नाही, असे आजी म्हणाली. अवांतर चेष्टामस्करीचा संवाद करुन, आजीला दिलखुलास हसायला लावून घरातून निघतांना हस्तांदोलन केले. आजीने दोन्ही हाताने माझा हात घट्ट दाबला. ती सद्गदित झाली. म्हणाली, ” तुम्ही सामान पोहचवून जाता. आजी जिवंत आहे की, मेली बघायला तुम्हाला वेळ नाही. असे कधीमधी येत चला. बर वाटतं.” हात सोडवून मी निघून आलो.
भिन्न विचारसरणी आणि भिन्न आदर्श मानणारे सांजसोबतचे कार्यकर्ते, वैयक्तिक मते आणि आग्रह समाजमाध्यमांपुरताच मर्यादित ठेवून काम करतात. पद, मानसन्मान हे सर्व जाणीवपूर्वक दूर ठेवून आपण ‘आपल्या’ आजीआजोबांची जबाबदारी उचललेली आहे अशा निर्मळ भावनेने गेली चार वर्षे ही मंडळी कार्यरत आहेत. परागच्या शब्दात सांगायचं तर ‘जशी आपण पोस्टात दरमहा आरडी भरतो, तशी ही देशभक्तीची आरडी आहे’. सांजसोबत परिवारातले सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या आजीआजोबांच्या गोष्टी आपल्या मनात नवी उमेद जागवतील यात शंकाच नाही.
पराग वडके यांचा संपर्क क्र. – 9881749259
– ऋजुता खरे, चिपळूण

Leave a Reply