आहे त्यात आनंद मानायला शिकलो
मागच्या वर्षी मार्च महिन्यात आगंतुक पाहुण्यासारखा आलेला हा कोविड त्याने खरंच अगदी या शीर्षकासारखीच गत केली आहे सगळ्यांची. सुट्टी कितीही आवडती असली तरी शाळा हवीच अशी मुलांचीच काय पालकांची पण अवस्था झाली आहे. ऑनलाईन शाळा, क्लास सगळं व्यवस्थित चालू आहे. पण मुलांचं म्हणणं तो फिल येत नाही ना…. शाळा, वर्ग, बेंच, दंगा, शिक्षक वर्गात आले की शांत बसणं. दोन तासांच्या मधली पळापळ अगदी मित्रा-मित्रातली भांडण सगळंच आम्ही मिस करतो. बरं हे सगळं का थांबलं आहे त्याविषयीचं गांभीर्य पालक, शिक्षक जाणून आहेत. त्यामुळे मुलांना समजावण्यापलीकडे काय करणार? मार्च २०२० ते मार्च २०२१ खरंतर बरंच घडलं काही चांगलं काही वाईट. पण मुलांच्या आणि आपल्या मानसिकतेचा विचार‌ करता आपण भलं तेच लक्षात ठेवतो.
पहिला लॉकडाऊन घरातच रहायचं ही खरंतर नंतर शिक्षा वाटायला लागली होती. या सगळ्याने मुलं चिडचिड करू लागली होती. सारखं काय हात धुवायला सांगतेस, बाहेर का नको जाऊ, घरातच का राहु या वाक्यांनी पालकही वैतागले होते. घरात असलेल्या खेळांचा अवघ्या आठवड्यात कंटाळा आला. पण यात आमची शाळा मदतीला‌ धावून आली. मुलांसाठी पहिल्या, दुसऱ्या लॉकडाऊनला त्यांनी भन्नाट उपक्रम घेतले. अगदी‌ घरकाम, स्वयंपाक, गृहस्वच्छता‌ ते विविध व्रतांचे एकेक दिवस पालन. त्याविषयी खरंतर वेगळेच प्रकरण लिहुन होईल. पण एक मात्र नक्की या उपक्रमांनी मुलं आणि‌ पालक सगळेच स्थिरावले.
शाळा उपक्रमांमुळे काही वेळ सत्कारणी लागला हे खरं. पण दिवसाला असतात २४ तास हो! पैकी झोप जरी सहा तास,‌ शाळा उपक्रम चार पाच तास बाकीच्या वेळेचं काय? टिव्ही बघून बघून किती बघणार बरं! त्यावेळच्या आठवणी काढत जुन्या मालिका आम्ही अगदी आवर्जून बघायचो. आणि special effect च्या effect खाली वावरणारी मुलं त्या मालिका comedy म्हणून बघत. त्यामुळे ठराविक जुन्या मालिका बघण्यापलीकडे आम्ही काही फार‌ पल्ला गाठला नाही. बरं, बातम्या बघायच्या तर काळजीत भर अशी गत. बातम्या बघताना घरात कित्येकदा वादाला सुरुवात होई. पहिला लॉकडाऊन अगदी कडक होता. अत्यावश्यक सेवा या व्यतिरिक्त काहीही चालू नव्हतं. त्यामुळे रस्त्यावर फिरणा-यांना पोलिस काठीचा प्रसाद वाटत होते. हे बघताना त्या लोकांच्या पाठ, पाय चोळत पळण्याने आणि ओयोय…..या आवाजाने लेक हसायला लागायचा. काहीतरी महत्त्वाचं काम म्हणून लोक बाहेर पडतात आणि बिचारे मार‌ खातात. पण पोलिस तरी काय करणार विनाकारण घराबाहेर भटकणा-यांमुळे कामासाठी जाणारे ही मार खातात. या दुहेरी मताने लेकाचे बाबा चिडायचे. काही दिवसांनी मार खाणा-यांच्या अडचणी पण कळू लागल्या. आणि पोलिसांची पण आपलं काम करावंच लागतं ही भूमिका कळली आणि लेकाला त्या बातम्या बघून मनात चलबिचल व्हायला लागली. मग काय बातम्या बघणं बंदच केलं.
काही दिवसांनी आम्ही घरात एक उपक्रम सुरू केला. रोज संध्याकाळी रामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, जपमाळ चालूच होतं. त्यात भर म्हणून आम्ही रोज पुस्तकाचं एक पान वाचायचो. सुरूवात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाने केली. रोज एकच पान मग त्या तारखेचं पान वाचायचं. पोथी वाचल्यासारखं नाही तर एखादी गोष्ट वाचावी असं. त्यामुळे आपण त्यात भावनिक गुंतत नाही असं नव-याच मत. आम्ही अगदी सहज म्हणून काही दिवस रामायण पण वाचलं हा पण रोज एकच पान. हा उपक्रम चांगला एक महिना चालला. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक पान वाचायचे आणि त्यावर सहजरित्या चर्चा पण घडू लागली. आपापल्या मतांची मांडणी करताना मजा आली. ही पिढी आपल्यापेक्षा बराच वेगळा विचार करते हे एव्हाना आपण मान्य केलेले आहेच. लेक हे उदाहरणासह दाखवून देत होता. ठरवून बरीच पुस्तकं वाचली अगदी पैज लावून म्हणलं तरी चालेल. आई, मी अग्निपंख वाचतोय तोवर तुझं हे पुस्तक वाचून होतंय का बघू अश्या पैजा‌ लागल्या. बरं वाचताना आवडलेलं पान, ओळी यांचं प्रकट वाचन हा अनुभव तर आम्हाला फारच आनंद देऊन गेला.
घरात इन-मीन तिघंच असलो तरी सगळे नातलग एकाच इमारतीत असल्याने त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला. संध्याकाळी सगळे टेरेसवर गप्पा मारत बसायचो. गप्पा जुन्या काळातल्या जास्त रंगायच्या.
आलेल्या संकटावर योग्य ती काळजी घेऊन मात करणे हेच आपल्या हाती. बाकी सगळं क्षेम आहे.
– शरयु रबडे

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading