अवैध सावकारी मोडीत काढणारा धुळे पॅटर्न
ग्रामीण भागातल्या सावकारीसह आता शहरी भागातही सावकारीचे पाश अनेक नागरिकांच्या जीवावर उठलेले आहेत. अवैध सावकारीमुळे मोठ्या प्रमाणात व्याजाची वसुली केली जाते आणि त्यात अनेक कुटुंब उध्वस्त  होतात. शहरी आणि निमशहरी भागातली सावकारी ही शेतकरी आत्महत्यांप्रमाणेच  गंभीर वळणावर आहे. हीच बाब लक्षात घेऊन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात मोहीम छेडली आणि बघता बघता काही महिन्यांमध्ये जिल्ह्यातला अवैध सावकारीचं जाळं  खिळखिळं  झालं.  शेकडो सावकार पीडित  कुटुंबांना त्यामुळे  दिलासा मिळाला. 
धुळे जिल्ह्यात  तीन महिन्यात  64 अवैध सावकारांवर 15 गुन्हे दाखल करण्यात आले.  सहा जणांना अटक करण्यात आली.  धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नव्याने  रुजू झालेल्या प्रवीण कुमार पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी तसेच धुळेकरांसाठी  कुठल्या समस्या प्राधान्यानं  सोडवल्या पाहिजे, याचा अभ्यास केला. यातून त्यांना शहरी भागामध्ये अवैध सावकारीचं जाळं   सर्वत्र पसरल्याचं  निदर्शनाला  आलं. हे जाळे  उध्वस्त करायचा संकल्प पाटील यांनी केला.   अवैध सावकारांकडून होणाऱ्या छळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा आवाहन लोकांना केलं.  या आवाहनाला प्रतिसाद देत, अनेक सावकार पीडित कुटुंब पुढे आली.
सर्वात आधी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये एका कुटुंबाचं  जगणं  त्राही करून सोडणाऱ्या सावकारांविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अवैध सावकारी करणारा विमा एजंट राजेंद्र बंबकडे कोट्यवधी रुपयांचं  घबाड सापडलं. यात 12 कोटी पेक्षा अधिकची रोकड, त्यापेक्षा अधिकचे दागदागिने आणि शेकडो कुटुंबांची मालमत्ता खरेदी केल्याची कागदपत्रं  पोलिसांनी जप्त केली.  जूनमधल्या या कारवाईनंतर  अनेक अवैध सावकारांविरोधात पीडितांनी तक्रारी दाखल करायला सुरुवात केली आहे. पोलीसही अशा तक्रारींची विशेष दखल घेत आहेत. एक विशेष कक्षदेखील यासाठी स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे शहरी भागातील सावकारी मोडून काढण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे.
हे अवैध सावकार सर्वसामान्य नागरिकांकडून  24 ते 36 टक्क्यांपेक्षा अधिकच व्याज आकारत  होते. अनेक ठिकाणी चक्रवाढ पद्धतीनं  व्याज आकारणी केली जात होती. त्यामुळे अनेक कुटुंब  दिवाळखोरीत ढकलली  गेली  होती. मात्र पोलिसांनी  छेडलेली मोहीम आणि जाणीवपूर्वक लक्ष देऊन केलेल्या कारवायांमुळे  अनेकांनी स्वतः पीडितांच्या कुटुंबीयांना भेटी देऊन पैसे माफ केल्याच्याही चर्चा शहरात ऐकायला मिळत आहेत. अवैध सावकारांपासून धुळेकर जनतेला काहीसा दिलासा मिळालेला आहे, असं म्हणता येईल. धुळे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी जिल्ह्यात राबवलेला अवैध सावकारीविरोधातला हा पॅटर्न आता सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने पोलीस कारवाई करताना दिसून येत आहेत.
राज्यात सावकारी नियमन कायदा आहे. या कायद्याविषयी, कर्ज मिळवण्याचे संस्थात्मक किंवा वैध स्रोत, अनावश्यक कारणांसाठी कर्ज घेणं टाळणं, बचत याविषयी मोठ्या प्रमाणात जागृतीची आवश्यकताही यासोबत आहे.
-कावेरी परदेशी, धुळे

Leave a Reply