कलेमुळे खरोखर मिळाली नवी ‘दृष्टी’

सोलापुरातील बार्शीचे तरूण चित्रकार महेश मस्के. बार्शी तालुक्यातील जामगावचे रहिवासी, घरची परिस्थिती तशी यथातथाच, आई- वडील शेतकरी. जन्मापासूनच एका डोळ्याने दिसत नाही, हे त्यांची सुंदर चित्रं पाहणाऱ्यांना खरं वाटणार नाही. कधी जमिनीवर मातीत- चिखलात रेघोट्या मारून, तरी कधी पेन्सिलने रेखाटनं करून आपला छंद त्यांनी जोपासला. पुढं त्यांनी कलाशिक्षक म्हणून पदवी घेतली. मात्र सकाळी १०  ते संध्याकाळी ५ च्या नोकरीत त्यांचा जीव रमत नव्हता. त्यामुळे चित्रकला, चित्रांना पोर्टेटना वेळ देणं यालाच त्यांनी कायम प्राधान्य दिलं.

ऑपरेशनपूर्वी आणि ऑपरेशननंतर लेन्स बसविल्यावर चित्रकार महेश म्हस्के

अनेक नेते, अभिनेते, राजकारणी, खेळाडू आणि अनेक सामान्यांचीही पेन्सिल पोर्टेट महेश यांनी केली आहेत. त्यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पिंपळाच्या पानावर कोरून व्यक्तीचा हुबेहुब चेहरा बनवणे. एका डोळ्यानं दिसत नसतानाही महेश अतिशय सुरेख कलाकृती तयार करतात. आत्तापर्यंत नागराज मंजुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता सोनू सूद इ. सह अनेकांची पिंपळपानावर तयार केलेली रेखाटनं आणि पोर्टेटस गाजत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत पिंपळपानावर सातहजारांहून जास्त रेखाटनं काढलेली आहेत.

महेश म्हस्केंची कलाकृती- पिंपळपानात अजितदादा पवार

हे सगळं जरी असलं तरी महेशना कुठं तरी खंत होती, की आपल्याला नीट दिसत नाही. महेश यांच्या डाव्या डोळ्यात बुबुळ नसल्याने ते विचित्रही दिसते याची खंत त्यांना होती. त्यामुळे अनेकदा महेश हा डोळा लपविण्यासाठी गॉगल घालून वावरायचे. या डोळ्यावर उपचार करण्यासाठी लेन्स मिळवता येते का, याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. पण तुमच्या डोळ्यासारख्या हुबेहुब लेन्स तयार करून घेण्यासाठी प्रचंड खर्च येतो आणि वेळही भरपूर लागतो, हे त्यांना कळले. ही गोष्ट महेशचे मित्र डॉ. मोहसीन यांना माहिती होतीच.

आपल्या गुणी मित्राला वैद्यकीय मदत मिळवून द्यायचीच, असा चंग त्यांनी बांधला. डॉ. मोहसीन यांनी त्यांच्या अमेरिकेतल्या मित्रांना महेशची उत्कृष्ट कला आणि त्याच्या डोळ्याच्या समस्येबाबत सांगितले. महेशच्या चित्रांचे फोटो पाहून, त्याचं बार्शीसारख्या ठिकाणी राहून चालू असलेलं उत्तम काम पाहून ही अमेरिकन मंडळी अतिशय प्रभावित झाली. ते इतके प्रभावित झाले, की त्या पैकी काही नेत्रतज्ज्ञांनी महेशच्या डाव्या डोळ्यासाठी हुबेहुब लेन्स अमेरिकेतून तयार करून घेतली आणि पुण्यात येऊन महेश यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची तयारीही दाखवली.

या सगळ्या गोष्टींवर महेश मस्केंचा विश्वास बसेना. पण खरोखर जुलै महिन्यात हे ऑपरेशन पुण्यात पार पडले आणि त्यांच्या डोळ्यात फायबर लेन्स बसवण्यात आली. या लेन्समुळे दिसत नाही, पण सामान्य माणसाप्रमाणे साधे- नैसर्गिक दोन डोळे दिसतात. आपण एका डोळ्याने अंध आहोत, हे पाहणाऱ्याला कळत नाही. अमेरिकेतील लिअम, समीरा, कॉर्टनी, ट्रेव्हर यांनी महेशच्या उजव्या डोळ्याप्रमाणे हुबेहुब ही लेन्स तयार केली आहे. ऑपरेशन झाल्यानंतर महेशने या डॉक्टरांची चित्रं आणि त्यांची नावं पिंपळपानात कोरून देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

ऑपरेशन करणाऱ्या अमेरिकन डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना चित्रकार महेश म्हस्के

आता महेश यांचे डोळे सामान्यांसारखे दिसतात. ते म्हणतात, “ कलाकृतीच्या माध्यमातून आपण जगावर राज्य करू शकतो, याची प्रचिती मला या शस्त्रक्रियेमुळे आली. माझ्या कलेवर खुश होऊन त्यांनी आपणहून ही स्पेशल लेन्स बनवून दिली, माझी दखल घेतली. सर्वसाधारण माणूस असलो असतो तर, अशी दखल घेतली गेली नसती. मला अविस्मरणीय गिफ्ट मिळाले, डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानंतर मी दोन्ही डोळ्यांनी स्वतःला पाहिले, त्यावेळचा आनंद अविस्मरणीय होता. माझ्या चेहऱ्यावरील आनंद पाहून डॉक्टर ही भावुक झाले होते. एक ही रूपया खर्च न करता माझ्या कलेला दाद देऊन त्यांनी मला लेन्सच्या रूपाने मदत केली. लहानपणापासून अपंगत्व अनुभवत होतो, आता तो न्यूनगंड माझ्या कलेमुळे दूर झाला आहे. सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार.”

महेश म्हणतात, “मला त्या सगळ्यांची भाषा समजत नव्हती, पण माझ्या देहबोलीतून, हावभावातून आणि या नव्या डोळ्यातून मला काय म्हणायचं आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचत असावं. पुन्हा एकदा डॉक्टरांना आणि माझा मित्र डॉ. मोहसिन यांना मन:पूर्वक धन्यवाद”

लेखन: जवेरिया रईस, सोलापूर

नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

 

#नवी_उमेद

#सोलापूर

#बार्शी

#महेशमस्केबार्शीकर

#मैत्री

#चित्रकार

Leave a Reply