चौघांच्या लसीकरणाची गोष्ट

 

कोविड19 च्या दुसऱ्या लाटेचं भयावह रुप समोर आलं आणि आता लोकांना लसीकरणाचं महत्त्वही पटू लागलं. पण हे झालं शहरातलं चित्र. नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात मात्र अजूनही लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद नाही आणि त्याविषयी जाणीवजागृतीही कमी आहे. विविध गैरसमजुतींमुळे लसीकरणाला गावातील नागरिकांचा विरोध आहे. हेच अक्कलकुवा तालुक्यातील चिखली इथल्या पाटीलपाडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दीपक वसावे यांना जाणवलं.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं काम शिक्षकांमार्फत करण्यात येत आहे. बऱ्याच गावात लसीकरणाबाबत गैरसमज असल्याने आधी ग्रामस्थांना त्याचं महत्त्व समजावून त्यांचं नोंदणीसाठी सहकार्य मिळवणं हे मोठं आव्हान आहे.

सातपुड्यातील आणि परिसरातील ग्रामीण भागात लसीकरण शब्द ऐकल्यावरच दार बंद केलं जातं. बाहेरची व्यक्ती घरात येऊ नये ही ताकीद देण्यात येते. मुलांना एखाद्या अडचणीवर मात कशी करायची हे शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या याच अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग करीत जनजागृतीचं काम सुरू ठेवलं आहे. त्यात वसावे सर आघाडीवर आहेत. नंदुरबारमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी. डोंगरदऱ्यांमधील विरळ घरं. असं असूनही वसावे सरांनी आपल्या दुचाकीवर गाव, पाडे, वस्त्या पिंजून काढल्या. एक स्पीकर आणि माईक घेऊन परिसरात कोरोनाबाबत ते जनजागृती तर करतातच, सोबत लसीकरणाचं महत्त्वही सांगतात. ‘गुरुजी’ सांगतोय, म्हणून या भागातल्या ग्रामस्थांनी त्यांचं म्हणणं ऐकून तरी घेतलं.
वसावे गुरुजींचा स्थानिक बोलीभाषेत प्रभावीपणे बोलतात. त्यामुळे, त्यांना प्रतिसादही चांगला मिळू लागला आहे. लसीकरणाचे फायदे, लसीकरण कुठं सुरू आहे, लसीकरणासाठी वयाची पात्रता, लस घेतल्यानंतरची दक्षता, मास्कचा वापर, शारीरिक अंतराचं पालन हे सारं या दुर्गम भागात पोचलं. शेवटी, गुरुजींनी लसीकरणासाठी आवाहन केलं. गावातील 4 नागरिक तयार झाले. ही संधी न दवडता त्यांनी मोबाईल कव्हरेज मिळवण्यासाठी जवळची टेकडी गाठली. चौघांच्या आधार कार्डांच्या सहाय्याने त्या चौघांची नोंदणी केली.
दुसऱ्या दिवशी वसावे गुरुजींचे पाय नव्या वस्तीकडे वळले. मोठ्या शहरांत ४ जणांचे लसीकरण ही बाब क्षुल्लक असली तरी नंदुरबारसाठी हे नक्कीच विशेष आहे.

– कावेरी परदेशी, अक्कलकुवा, नंदुरबार

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading