शाळा बंद शिक्षण सुरू!

 

“कोरोनामुळे आमच्या शाळा बंद होत्या. नंतर ऑनलाईन शाळा सुरू झाल्या. पण माझ्याकडे आणि माझ्या मैत्रिणींकडे मोबाईल नाही म्हणून आम्हाला ऑनलाईन शिक्षण घेता येत नव्हतं. आता गावातच ऑफलाईन शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे आमचं शिक्षण सुरू झालं आहे. ऑनलाइन शाळेपेक्षा शिकवलेलं अधिक चांगल्या प्रकारे लक्षातही राहतं.” माजलगाव तालुक्यातील वारोळा आश्रमशाळेतील तिसरीतली श्रावणी चौरे सांगत होती.
बीड जिल्ह्यातील माजलगावच्या वारोळा तांडा इथं समाजकल्याण विभागामार्फत प्राथमिक आश्रमशाळा चालवली जाते. या शाळेत शिक्षण घेणारी मुलं मागास गटातील आहेत. आजूबाजूच्या १२ गावातील अडीचशे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. आणि मोबाईल अभावी त्यांचं शिक्षण थांबलं होतं.


इथल्या उपक्रमशील शिक्षकांमुळे शाळेने ‘आयएसओ’ मानांकनही प्राप्त केलेलं आहे. कोरोनामुळे शाळा बंद असतानाही शिक्षकमित्रांच्या मदतीने वारोळा शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवलं. मुख्याध्यापक व्ही.पी.कचरे म्हणतात, “आमच्या आश्रमशाळेतील मुलं गरीब कुटुंबातली आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी तशा सुविधा असलेला अँड्राॅईड मोबाईल घेण्याची त्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती नाही. शिवाय, दुर्गम भागात तांड्यावर शाळा असल्याने इंटरनेट नेटवर्क नाही. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक सत्र सुरू होणार नाही असा अंदाज आधीच आला होता. पण, विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडू द्यायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. यातूनच शिक्षकमित्रांची कल्पना पुढे आली.”
समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी म्हणाले, “शिक्षकमित्रांच्या मदतीने नऊ ठिकाणी प्रत्येकी १० ते १५ विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गावातच वर्ग सुरू केले गेले. हे शिक्षकमित्र म्हणजे गावातील शिकलेले तरुण, तरुणी आहेत. पालकांनी जागा उपलब्ध करून दिली. कोरोना नियमांचे पालन करून शिक्षकमित्र विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतात. शाळेचे शिक्षक या शिक्षकमित्रांना काय शिकवायचे हे सांगतात, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवतात. एप्रिल महिन्यापासून हा उपक्रम सुरू असल्याने शाळा बंद असली तरी शिक्षण मात्र सुरू आहे.” इतरांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी आहे.

– अमोल मुळे, माजलगाव, जिल्हा बीड
#नवीउमेद

Leave a Reply