अपंगत्वावर मात, लोकसेवेची आस
(परीक्षित यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी)
जन्मतःच दोन्ही हातांना बोटं नव्हती. पण आईवडिलांनी मेहनत आणि जिद्दीनं अपंगत्वावर मात करायला शिकवलं. इतर मुलांप्रमाणे लिहिता येत नाही ही भावना कधी जाणवली नाही. हातात पेन्सिल धरायला आईनं शिकवलं. अक्षरओळख ते सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण आणि पुढे स्पर्धा परीक्षेद्वारे क्लास वन अधिकारी. दुर्दम्य इच्छाशक्तीची ही गोष्ट आहे परीक्षित यादव यांची. यादव सध्या रत्नागिरी जिल्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी बजावत आहे. एकही फाईल टेबलावर पडून राहणार नाही असं वेळेत आणि चोखपणे जबाबदारी पार पाडणारे प्रामाणिक अधिकारी. परीक्षित यादव मूळचे सातारा जिल्ह्यातील. वडील शिक्षक तर आई गृहिणी. वर्ष २००२ मध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे क्लास वन अधिकारी म्हणून यश मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समितीत यादव रुजू झाले. त्यांनी यशवंत पंचायत राज अभियानात ही पंचायत समिती देशात पहिल्या क्रमांकावर आणली.अहमदनगर इथं ९ वर्षे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना जिल्ह्यात दुर्गम भागात शासनाच्या योजना घरोघरी पोचवण्याचं काम त्यांनी केलं.
जिल्हा परिषदेनं स्वच्छ ग्रामीण सर्वेक्षणमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पंतप्रधान आवास योजनेचा सर्वाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला.जिल्हा परिषदेच्या पुढाकारानं इस्त्रो सहलीसाठी गेलेले ग्रामीण भागातील ४२ विद्यार्थी मोठे अनुभवविश्व घेऊन अतिशय उत्साहात नगरला परतले. यासाठी संपूर्ण नियोजन परीक्षित यादव आणि त्यांच्या टीमनं केलं होतं. तीन दिवसांच्या सहलीत पाहायला मिळालेलं जग, विमानप्रवासाचा अनुभव, प्रत्यक्ष पाहिलेले रॉकेट लॉचींग, अवकाशात सोडण्यात आलेल्या उपग्रहांच्या प्रतिकृती, अंतराळवीरांचे खास पोशाख, असा संस्मरणीय ठेवा घेवून परतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आयुष्यात खूप अभ्यास करून संशोधक, शास्त्रज्ञ होण्याचा निर्धार व्यक्त केला यापेक्षा दुसरे समाधान नाही असं यादव सांगतात. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुलांसाठीही अशा उपक्रमाचा त्यांचा मानस आहे. संगणक क्षेत्राची विशेष आवड असलेल्या यादव यांची कामकाजाचं डिजिटलायझेशन,सरकारी योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ही खासियत. रत्नागिरी जिल्ह्यात कामकाज कार्यवाही आणि आदेश यांची माहिती जिल्हा परिषद वेबसाईटवर लवकरच दिसणार असून ही अंमलबजावणी करणारा रत्नागिरी जिल्हा राज्यातील दुसरा जिल्हा ठरणार आहे. यामध्ये परीक्षित यादव यांचे योगदान फार मोलाचे आहे. त्यांच्या विविध कामांची दखल घेऊन त्यांना तत्कालीन राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते गुणवंत अधिकारी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
– प्रतिनिधी, रत्नागिरी

Leave a Reply