मी केलेली चूक तुम्ही करू नये म्हणून…

साल २०२२- तुम्ही नागपूरचे रहिवासी असाल तर यांना वेगवेगळ्या चौकांत कित्येकदा पाहिलं असणार तुम्ही. एक माणूस हातात वाहतूक नियमांचे फलक घेऊन, वाहनं कशी सुरक्षितपणे चालवावीत, हेल्मेट घालणं का अत्यावश्यक आहे, वाहनं सावकाश चालवा, तुमच्या घरी कोणीतरी तुमची वाट पाहतंय अश्या अर्थाचे अनेक फलक घेऊन उभा असतो. एवढंच नाही तर येणाऱ्या- जाणाऱ्या पादचाऱ्यांसोबत ते संवाद साधून या विषयाचं महत्व पटवत असतात. काही लोक शांतपणे ऐकून घेतात, त्यांची कळकळ समजून घेतात, तर काही जण क्या पागल बंदा है, तुझ्यासोबत बोलणं म्हणजे वेळ घालवणं, अब तू हमें सिखाएगा गाडी कैसे चलानेकी? असलं काहीतरी आणि याच्यापेक्षाही बोचऱ्या अपमानकारक शब्दांत या माणसाची बोळवण करत असतात. तरीही ही व्यक्ती गेली १७ वर्षे सगळे अपमान गिळत, वाहतूक नियमांची जनजागृती अगदी नेमानं आणि प्रेमानं करतेय. का तर याला उत्तर आहे- “मी केलेली चूक पुन्हा कुणी करू नये आणि लोकांचा जीव वाचावा, कारण माझा जणू पुनर्जन्म झालाय. प्रत्येकाला ही संधी मिळतेच असं नाही” यांचं नाव आहे- संजयकुमार गुप्ता.

नागपूरच्या चौकात जनजागृती करणारे संजयकुमार गुप्ता

कट टू: साल २००४. नागपूरमधील संजयकुमार गुप्ता- शिक्षण बीएससी आणि डी फार्मसी. तेव्हाचे वय- २७. व्यवसायाने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेले संजयकुमार रोजच्या प्रमाणे कामावर होते. डॉक्टरांचा कॉल आल्याने त्यांना भेटायला जाण्याच्या घाईत, त्यांनी बाईकचा साईड स्टॅन्ड काढलाच नाही आणि हेल्मेटही घालायला विसरले आणि वेगात गाडी चालवत दवाखान्याकडे कामासाठी निघाले, यानंच घात झाला आणि संजयकुमार यांचा अतिशय भयंकर असा अपघात झाला, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली, त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. उत्तम उपचारांसाठी अक्षरश: तीन दवाखाने बदलले.

पण संजयकुमार काही शुद्धीवर येतच नव्हते, ते कोमात गेले होते, शहरातल्या प्रसिद्ध डॉक्टरांनी- आता हे वाचण्याची शक्यता जवळजवळ अर्धा टक्का आहे, हे कधीही मरतील अशीच कल्पना घरच्यांना दिली होती.त्यांच्या घरी अक्षरश: अंतिम बिदाईची तयारी सुरू झाली होती. बाकी सगळ्यांनी हा आता वाचणार नाही, अशीच खूणगाठ मनाशी बांधली होती. फक्त संजयकुमार यांच्या आईला आपला मुलगा नक्की वाचेल, अशी आशा होती. त्या माऊलीने घरातले होते- नव्हते ते पैसे मुलावर खर्च केले, प्रसंगी एफडी तोडली, त्याची मनोभावे सेवा केली. या माऊलीच्या सेवेला फळ मिळालं आणि तब्बल दीड महिन्यानंतर संजयकुमार कोम्यातून शुद्धीवर आले. मात्र ना त्यांना काही आठवत होते, ना काही बोलता येत होते, ना चालता येत होते, ना वाचता येत होते. त्या आईसमोर अशा मुलाला जगवणे एक चॅलेंजच होते. संजयकुमार यांचे वजन  फक्त ३० किलो झाले होते.  या कठीण प्रसंगी रक्ताची नाती सुद्धा त्यांना सोडून गेली होती. मात्र त्या माऊलीने जिद्द सोडली नाही, आपला मुलगा जगला- वाचला याचाच आनंद तिला सर्वात जास्त होता. संजयकुमारला तिने परत एकदा लहान मुलांना कसं सांभाळतात, तसं पालनपोषण केले. त्यांना वाचायला शिकवलं, बोलायला शिकवलं, एवढंच नाही तर एक एक पाऊल टाकत चालायलाही शिकवलं. या प्रयत्नात ते कित्येकदा पडले सुद्धा, हातात कुबड्या आल्या. मात्र त्यांनी हार मानली नाही .

संजयकुमार यांना पुन्हा पायावर उभी करणारी त्यांची आई

संजय यांचाही आत्मविश्वास प्रचंड दांडगा होता. त्यांना या अपघातातून नवजीवन मिळाले होते. एका चुकीमुळे आपल्यावर हा प्रसंग ओढवला हे त्यांना  कळून चुकले होते. हा प्रसंग दुसऱ्या कोणावर ओढवू नये, म्हणून त्यांनी वाहतूक विषयक जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. वर्षभरानंतर पायात पुरेशी ताकद नसतानाही, त्यांनी जनजागृतीपर बॅनर बनवून प्रत्येक चौकात उभं राहणं सुरू केलं. त्यात त्यांना पॅरालिसिस झाला होता, त्यामुळे ते ना धड स्पष्ट बोलू शकत होते, ना नीट चालू शकत होते. अशाही अवस्थेत त्यांनी शहरातील विविध जबाबदार व्यक्तींना भेटण्याचा सपाटा लावला. ‘काहींनी दारू पिऊन आला आहे- दारूड्या’ म्हणत अक्षरशः हाकलून लावले. तर काहींनी बोलण्याचेही टाळले. हा अपमान पचवून त्यांनी चौकात उभे राहणे सुरू केलं. तेव्हापासून आजतागायत ते दिवसाचे तीन तास नागपुरातील विविध चौकात वाहतूक नियमांची जनजागृती करत उभे असतात- कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता.

मात्र दोन जणांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली, ते म्हणजे मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि संजयकुमार यांचे कॉलेजचे प्राचार्य चंद्रकांत दुरबुडे यांनी. दिलीप वळसे पाटील एकदा गडचिरोली दौऱ्यावर जात असताना संजय बॅनर घेऊन उभे दिसले, वळसे पाटील यांनी जवळ बोलावून संजयकुमार यांची चौकशी, या कामामागचा उद्देश आणि त्यांची कथा जाणून घेतली. संजयकुमार यांचा प्रामाणिकपणा आणि समाजकार्य पाहून वळसेपाटील यांनी त्यांना २ वर्ष त्यांच्या पुणे जिल्ह्यातील मंचर येथे गेस्टहाऊस मध्ये ठेवले. कोविड काळात संजयकुमार यांना वळसे पाटलांच्या भावाने  १० लाख देऊ केले होते. मात्र स्वाभिमानी असलेल्या संजय यांनी ते नाकारले. मात्र ते आजही दिलीप वळसे पाटलांच्या संपर्कात आहेत. व्हाट्सअपवर त्यांचा कार्याविषयी माहितीची देवाणघेवाण केली जाते. वळसे पाटीलांनी त्यांच्या नावाची शिफारस पद्मश्री पुरस्कारासाठी सुद्धा  केली आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्यासमवेत संजयकुमार गुप्ता

जोपर्यंत पाय दुखत नाहीत तोपर्यंत उभे राहत ते लोकांना बॅनर दाखवत असतात. पू्र्वी ते  अक्षरश: तोल जावून खाली पडायचे तरी ते हिमतीने उठून परत उभे राहत असत. आता तर ते सलग ३ तास उभे असतात. आताही त्यांना नीट चालता  येत नाही. ते ६५ टक्के अपंग आहेत. तरीही त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. ते मागील १७ वर्षापासून सलग  फक्त नागपुरातच नव्हे तर देशात कोणत्याही शहरात गेले तरी, तिथल्या चौकात ते बॅनर घेऊन उभे राहतात. मुंबई, पुणे सारख्या शहरात सुद्धा त्यांनी बरेचवेळा जनजागृती केली आहे. याशिवाय ते शाळा कॉलेजात ‘ट्राफिक अवेअरनेस’ या विषयावर विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत असतात. एवढेच नाही तर पोलीस विभागातही ते कार्यक्रम घेत असतात. या कामासोबत संजयकुमार सध्या एका फार्मसीसोबतही काम करतात

संजय कुमार हे YOUTH  DEVELOPMENT  ALLIENCE नावाची संस्था चालवतात. ज्यात रस्ते सुरक्षा, स्त्री भ्रूण हत्या, व्यसनमुक्ती यासह विविध विषयांवर जनजागृती ते करतात. कोविड काळात फक्त ३ महिने त्यांनी आपले काम बंद केले होते. त्याही वेळेस हेल्मेट, मास्क, सॅनिटायझर विषयी  पोलिसांसह जनजागृती केली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.’अच्छा नेक इन्सान ‘ नावाचा पुरस्कार राजनाथ सिंग यांच्या हस्ते, तर गडकरी यांच्या हस्ते  केंद्र सरकारचा ‘Good Samartian Award’ या शिवाय अनेक मान्यवरांकडून  प्रशस्तीपत्र मिळाले आहेत. लोकांमधील वाहतूक नियमविषयीची उदासीनता दूर व्हावी आणि देश अपघातमुक्त व्हावा हीच त्यांची इच्छा आहे. त्यांचे हे आयुष्य जनजागृतीकरिता वाहून घेण्याचे त्यांनी ठरवले आहे.

लेखन- नीता सोनवणे, नागपूर

 

‘नवी उमेद’ची टीम दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली सकारात्मक कामं, घटना, व्यक्ती तुमच्यापर्यंत आणत असते. या कामाला खर्च येतो. त्यातला काही वाटा वाचक म्हणून तुम्ही उचलावा, ही विनंती. त्यासाठी ही लिंक:

https://naviumed.org/support/

 

अकाऊंट डिटेल्सः

Sampark account details

Name: SAMPARK

Account No: 50100547410322

Account Type: Savings

Branch Name: HDFC Bank, Goregaon East

IFSC Code: HDFC0000212

 

सोबतच ‘नवी उमेद’विषयी तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा.

 

#नवीउमेद

#नागपूर

#वाहतूकनियमजनजागृती

#रस्तेसुरक्षा

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading