सत्तरीत-साठीत वृद्धाश्रम चालवणारे गहिनीनाथ आणि कौंताबाई

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातल्या नळी वडगाव इथं एक गायरान जमीन आहे. तिथे पत्र्याची शेड असलेलं कुडाचं घर आहे. हा वृद्धाश्रम आहे. सत्तरीचे गहिनाथ दगडू लोखंडे हा वृद्धाश्रम चालवतात.
गहिनीनाथांचं शिक्षण केवळ तिसरीपर्यंत. चपला शिवणे, गवंडीकाम, टेलरिंग, ड्राइविंग अशी मिळेल ते काम करून त्यांनी आयुष्य काढलं. २०१३ मध्ये गहिनीनाथ केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेला गेले होते. तिथे अचानक महाप्रलय आला. त्यातून ते सुखरूप बचावले. ही घटना त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण देणारी ठरली. जवळून मृत्यू पाहिलेल्या गहिनीनाथ महाराजांनी उर्वरित आयुष्य समाजसेवेसाठी खर्च करायचं ठरवलं.


गहिनीनाथ महाराज सांगतात,”कामानिमित्त मुलं घर सोडून दूर नोकरीव्यवसाय करतात. उतारवयात खऱ्या अर्थाने आधाराची गरज असते, पण त्याचवेळी आजूबाजूला विचारपूस करणारं कोणीच नसतं. त्यांना आधार देण्याची गरज होती.”
२०१३ मध्येच त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ वृद्धाश्रम सुरू केला. . कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय. सुरुवातीला ३ जण असलेल्या या आश्रमात आता ३२ लोक राहतात. यात १३ महिला तर १९ पुरुष. यातील बहुतांश लोक निराधार.


या वृद्ध लोकांचा सांभाळ गहिनीनाथ महाराज स्वतः करतात. यात त्यांच्या पत्नी कौंताबाई यांची अत्यंत मोलाची साथ आहे. कौंताबाईही साठीच्या आहेत.
गहिनीनाथ महाराज रोज पहाटे पाच वाजता उठतात. वृद्धांना आंघोळ घालतात. सकाळी सात वाजता हरिपाठाने आश्रमाची सुरुवात होते. सर्वांना सकाळची न्याहारी देऊन गहिनीनाथ महाराज आश्रम चालवण्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्य घेण्यासाठी बाहेर पडतात. महिन्यातून एकदा सर्व वृद्धांची आरोग्य तपासणी केली जाते. या आरोग्य तपासणीसाठी गावालगतचे काही डॉक्टर मोफत वैद्यकीय सेवा देतात.
गहिनीनाथांच्या या कार्याची माहिती समाजात पोहचत आहे त्यामुळे लोक आपापल्या परीनं मदत करत आहेत.

-अमोल वाघमारे, ता. भूम, जि. उस्मानाबाद

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading