ताप येण्याची वेगवेगळी करणे आणि निदान
ताप आल्यावर साधारण दोन तीन दिवस साधी ताप कमी करणारी औषधे घेऊन, विश्रांती घेऊन किंवा बरेचदा पाण्याने अंग पुसून काढून वाट पाहू शकतो. पण तापमान पहिल्यापासून 101 डिग्री फॅरेनहाईटच्या वर असेल, थंडी भरून ताप येत असेल, ताप उतरतच नसेल, तापाबरोबर खोकला, रॅश, सांधेदुखी वगैरे लक्षणे असतील तर लॅबोरेटरी टेस्टस करून निदान करून घेणे चांगले.
ताप येण्याचे कारण हे 80 टक्क्यांहून जास्त लोकांत रोगजंतूंचा संसर्ग हेच असते. मात्र रोगजंतूंचे बॅक्टरीया, व्हायरस, फंगस, अमिबा सारखे आदिजीव आणि जंत असे अनेक प्रकार आहेत. तसेच ह्या प्रत्येक प्रकारात अनेक वेगवेगळे जंतू आहेत. प्रत्येकाला वेगळे औषध द्यावे लागते. त्यामुळे नक्की कोणत्या जंतूंमुळे रोग झालाय ह्याचे निदान करावे लागते.
हे निदान 2 प्रकारे होते – 1 प्रत्यक्ष जंतू सूक्ष्मदर्शकाखाली बघून किंवा त्यांचे कल्चर करून.
2 अप्रत्यक्षपणे अँटिबॉडीज तयार झालेल्या दाखवून.
1 बॅक्टेरियामुळे होणारे आजार
ह्यात टायफॉईड, न्यूमोनिया, मेनिन्जायटीस, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, गळवे होणे, टी बी हे आजार येतात.
धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प इ. आजारांवर लस सापडल्यामुळे आता ते आजार जास्त दिसून येत नाहीत. मात्र तशी लक्षणे असल्यास हे निदान मनात ठेवून त्याच्या टेस्ट कराव्या लागतात.
रॉबर्ट कॉख ह्या शास्त्रज्ञाने एखादा आजार एखाद्या जंतूंमुळे होतो हे सिद्ध करण्यासाठी काही नियम सांगितले आहेत.
1 तो आजार झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील घावांतून(lesion) वा रक्तातून तो जंतू वेगळा करता आला पाहिजे.
2 तो जंतू निरोगी माणसाला टोचल्यास तसेच घाव (lesion)निर्माण झाले पाहिजेत.
हे नियम वापरून आता सर्व रोग निर्माण करणाऱ्या जंतूंचा शोध लागला आहे.
1 टायफॉईड: हा सालमोनेला टायफी ह्या जंतूंमुळे होते. हे जंतू लहान आतड्यात अल्सर निर्माण करतात. रोग्याच्या विष्ठेमार्फत हे जंतू बाहेर पडत असतात. जर मलविसर्जनानंतर हात नीट धुतले नाहीत आणि त्याच हातांनी अन्न बनवले तर त्या अन्नातून ते दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जातात. म्हणून हॉटेल, खानावळी ह्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची टायफॉईडसाठी वरचेवर तपासणी केली जाते.
मराठीत ह्याला मुदतीचा ताप असे म्हणतात. ह्यात ताप न उतरता रोज वाढत जातो, हृदयाचा वेग कमी होतो, जीभ पांढरी होते.
निदान:
CBC: रक्ताच्या तपासणीमध्ये पांढऱ्या पेशी वाढतात.
विडाल टेस्ट: ही अँटिबॉडीज दाखवणारी टेस्ट आहे. मात्र ही तितकीशी अचूक नाही.
रक्ताच्या गाठीचे कल्चर: हे बॅक्टरीया एक आठवड्यानंतर रक्तात असतात त्यामुळे त्याचे कल्चर केल्यास अचूक निदान होते.
पूर्वी टायफॉईड हा जीवघेणा रोग मानला जायचा. क्लोरोमायसेटिन ह्या औषधाने क्रांती झाली. मात्र ह्या औषधाने बॉन मॅरोला इजा होते त्यामुळे आता ते बॅन केले आहे. आता ह्यावर बरीच औषधे आहेत.
गळवे होणे: डायबेटिस झालेल्या लोकांना जरा जखम झाली की गळू होते. हे जखमेत स्टाफलोकोकाय नावाच्या जंतूंचा संसर्ग झाल्याने होते. ह्यामुळे ही ताप येतो पण गळू दिसतच असते. मात्र ते गळू पूर्ण पिकले की कापावे लागते आणि पू पूर्णपणे काढून टाकावा लागतो. त्यानंतर त्याचे (pus culture) कल्चर करावे लागते.
नंतर ह्या बॅक्टरीयाला कोणते अँटिबायोटिक लागू पडेल ते बघायला सेनसिटीव्हीटी टेस्ट करतात व त्यातून जे अँटिबायोटिक परिणामकारक आहे ते दिले जाते. गळू न कापता अँटिबायोटिक दिल्यास गळवाचा एक कडक गोळा होऊ शकतो ज्याला अँटी बायोमा म्हणतात.
कधीही गळू झाल्यास ब्लड शुगर तपासून डायबेटिस नाही ना ह्याची खात्री करावी लागते.
डायबेटिस आधीपासूनच असेल तर इन्सुलिन द्यावे लागते.
न्यूमोनिया: न्यूमोनिया म्हणजे फुप्फुसांचे इन्फेक्शन. ह्यात मुख्य लक्षण म्हणजे बरा न होणारा खोकला. खोकल्यातून रक्त पडते, श्वास घेण्यास त्रास होणे, खूप जास्त तापमान वाढणे इ. टी बी हा सुद्धा फुप्फुसांचा रोग आहे पण ह्यात ताप रोज संध्याकाळी येतो, नुसती कणकण वाटते. थुंकीतून रक्त पडते, वजन कमी होते, मानेत गाठी होतात. हा जुनाट रोग आहे. ह्याउलट न्यूमोनिया थोड्या काळात होतो.
न्यूमोनिया चे निदान –
CBC: पांढऱ्या पेशींची संख्या वाढते. न्यूट्रॉफील प्रकारच्या पेशी वाढतात.
थुंकीची तपासणी: थुंकीमध्ये बॅक्टरीया दिसतात. पांढऱ्या पेशीही जास्त असतात.
थुंकीचे कल्चर आणि अँटिबायोटिक सेनसिटीव्हीटी: ह्यामुळे नक्की कोणते जंतू आहेत आणि कोणते औषध द्यावे ते समजते.
छातीतील पाणी: न्यूमोनिया मध्ये छातीत पाणी होते. ह्याचेही कल्चर करता येते.
बाकी एक्सरे, सीटी स्कॅन इ तपासण्या सुद्धा कराव्या लागतात.
मेनिन्जायटीस: हे मेंदू वरील आवरणाचे इन्फेक्शन असते. ह्यात तापाबरोबरच मान, डोके दुखणे, शुद्ध हरपणे वगैरे लक्षणे दिसतात.
निदान पाठीच्या कण्यातील पाणी काढून त्याची तपासणी करतात.
CSF (सेरीब्रो स्पायनल फ्लूईड) मध्ये न्यूट्रॉफील जास्त असणे.
ह्याचेच कल्चर आणि सेनसिटीव्हीटी करून कोणते औषध लागू पडेल ते ठरवतात.
टी बी: ट्युबर्क्युलोसिस
ह्या रोगात फुप्फुसांत गाठी होतात. तो भाग दगडासारखा होतो. खोकल्यातून रक्त पडते.
निदान –
ESR: ह्यात ESR वाढतो. पण ह्याने फक्त निदानाकडे निर्देश होतो.
थुंकीची तपासणी: ह्यात टी बीचे जंतू दिसतात.
मात्र सर्वच रोग्यांमध्ये हे दिसतील असे नाही.
थुंकीची PCR टेस्ट: कॉरोनामुळे आता ही टेस्ट माहीत झाली आहे. बॅक्टरीयल DNA च्या कॉपीज काढून निदान केले जाते. ही तपासणी अचूक असते. टीबीच्या रोग्याला समाजाची हेटाळणी सहन करावी लागते म्हणून ह्याचे अचूक निदान आवश्यक आहे. तसेच निदान झाल्यावर सरकारला रोग्याची माहिती कळवावी लागते.
– डॉ. मंजिरी मणेरीकर

Leave a Reply